अजितदादांमुळे भाजपला फटका
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मोठा पराभव झाला. यामध्ये सत्ताधारी भाजपाला केवळ नऊ, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाला सात तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली. या पराभवावरुन राज्याच्या सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार नाराजी आहे. त्यासोबतच अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर ती अधिकच आहे. सुनेत्रा पवार यांना पक्षाने दिलेल्या राज्यसभा उमेदवारीवरुन ही नाराजी अधिकच उफाळून आली असून छगन भुजबळ यांच्या रुपात ही नाराजी उघडपणे व्यक्त झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवास अजितदादाच जबाबदार असल्याचे स्फोटक वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपाच्या पराभवाचे विश्लेष करणारा लेख एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑर्गनायझर या दैनिकात छापून आला आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील भ्रष्ट मंत्र्यांना पक्षात प्रवेश दिल्याचा फटका भाजपाला बसला, असे म्हटले आहे. यावर विचारले असता भुजबळ म्हणाले होय, अजितदादा यांच्यामुळे भाजपाला फटका बसला आहे. हे खरे आहे. पण, असे असले तरी केवळ महाराष्ट्राबाबत पाहून चालणार नाही. देशातील इतर राज्यांमध्येही भाजपाला फटका बसला असल्याचे भुजबळ म्हणाले.