शरद पवार गटाची पाचवी यादी जाहीर, पंढरपूर मतदारसंघावरून गोंधळात गोंधळ

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने आज आपली उमेदवारांची पाचवी अधिकृत यादी जाहीर केली. यामध्ये पाच जणांना संधी देण्यात आलेली आहे.
पाचव्या यादीत पाच उमेदवारांचा समावेश आहे. मोहोळ मतदारसंघात सिद्धी रमेश कदम यांच्याऐवजी आता राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून अभिजित पाटील, पंढरपूर येथून अनिल सावंत, मोर्शी येथून गिरीश काळे, मुलुंडमधून संगीता वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीत पंढरपूर मतदारसंघ नेमका कोणाला सुटणार, यावर उमेदवारीची गणिते अवलंबून होती. परंतु या जागेवर कॉंग्रेस आणि शरद पवार गट दोन्हींकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे पंढरपूरवरून महाविकास आघाडीत गोंधळ वाढल्याचे चित्र आहे.
काँग्रेसने पंढरपूर मतदारसंघातून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तिथेच पवारांनी देखील उमेदवार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा असलेला पाहायला मिळत आहे. काल कॉंग्रसने जाहीर केलेल्या यादीत भगीरथ भालके यांचे नाव होते तर आज शरद पवार गटाने आज जाहीर केलेल्या यादीत अनिल सावंत याचे नाव आहे.
त्यामुळे आता महाविकास आघाडीचा नेमका कोणता शिलेदार पंढरपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मैत्रीपूर्ण लढत होणार की महाविकास आघाडीत बिघाडीचा संघर्ष पाहावा लागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. माघार नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हेदेखील पाहावे लागणार आहे.



