ज्याच्यावर जिवापाड प्रेम, त्यानेच घात केला
प्रेमाला प्रेयसीच्या घरच्यांचा विरोध असल्याने प्रियकर आणि प्रेयसीत जोरदार भांडण झाले. या भांडणात राग अनावर झाल्याने प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह झाडीत फेकून देऊन फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पालघर येथील मुरबेत काल सकाळी घडली.
स्नेहा पुरुषोत्तम चौधरी (वय वय) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सुमित तांडेल (वय २१) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. फरार सुमितला पोलिसांनी सातपाटी येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहा व तिचा सुमित हे मुरबे येथील राहणार आहे. हे दोघेही तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करत होते. दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांना लग्नदेखील कारायचे होते. मात्र, त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता.
दोघेही काल सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जायला निघाले. मात्र, रस्त्यात कुंभवली गावाजवळ त्यांच्यात लग्नावरून भांडण सुरू झाले. या भांडणादरम्यान सुमितचा राग अनावर झाल्याने त्याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून तिला गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सुमितने स्नेहाला दवाखान्यात नेतो, असे सांगून तिला दुचाकीवर बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परीसरात घेऊन गेला. येथे त्याने तिची हत्या केली.