क्राईम
ब्रेकिंग! डीजेच्या दणदणाटाने घेतला दोघांचा जीव

- सध्या सोलापूरसह विविध भागात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. दरम्यान उद्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी विविध गणेश मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली असून बाप्पाच्या निरोपासाठी बँड पथक तसेच ढोल ताशा पथकाचा कसून सराव सुरू आहे. अशातच सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डीजेच्या दणदणाटाने सांगलीत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लावण्यात आलेल्या डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेखर सुखदेव पावशे (वय 32) आणि प्रवीण यशवंत शिरतोडे (वय 35) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील कवठेएकंद गावात मिरवणुकीत बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. यात शेखर हा तरुण नाचत होता.
परंतु नाचता-नाचता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. मिरवणुकीत नाचत असलेल्या इतर लोकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
दुसरी घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आहे. दुधारी गावात गणपतीची मिरवणूक सुरू असताना डीजेच्या दणदणाटाने प्रवीणला अस्वस्थ वाटू लागले. मिरवणुकीतच त्याला चक्कर आली. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना प्रवीणचा मृत्यू झाला.