देव दर्शन घेऊन घरी निघाले; ओढणी बुलेटच्या चाकात अडकली अन् …

बाईकवरुन प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण थोडीशी जरी चूक झाली तरी मोठा अनर्थ घडतो. अशीच एक दुदैवी घटना मुंबईच्या वसई येथे घडली आहे. पती-पत्नी देवदर्शनाहून घरी निघाले असताना चाकात ओढणी अडकून पत्नीचा मृत्यू झाला आहे.
प्रतिमा मनीषकुमार यादव (वय २७, रा. इराणवाडी, कांदिवली पश्चिम) असे मृत महिलेचे नाव आहे. बायकोच्या निधनामुळे पतीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मुंबईहून एक जोडपे आपल्या मनातील इच्छा घेऊन तुंगारेश्वार येथील महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. महादेव चरणी त्यांनी मस्तक टेकवले आणि मनातील इच्छाही सांगितली. दरम्यान, देवदर्शन झाल्यावर दोघेही पुन्हा आपल्या घराच्या दिशेने निघाले.
प्रतिमा आणि मनीषकुमार दोघेही बुलेटवरुन घरी जात होते. यावेळी प्रतिमाची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्याने प्रतिमाला गळफास बसला आणि बुलेटचा अपघात झाला.
या अपघातात प्रतिमाच्या डोक्याचा जोरात मार लागला. त्यामुळे प्रतिमाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. प्रतिमाचा जीव वाचावा म्हणून मनीषकुमारने तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. अपघातात प्रतिमाने आपल्या पती समोरच जीव सोडला.



