देश - विदेश
भारत इतिहास रचणार! चांद्रयान ३ लँडिंगसाठी सज्ज

- भारत आज सायंकाळी अंतराळात इतिहास रचणार आहे. चंद्रयान ३ आज चंद्रावर उतरण्यास सज्ज झाले आहे. संपूर्ण भारत ही मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहे.
इस्रो चंद्रावर चांद्रयान ३ सुरक्षितपणे उतरण्यासाठी सज्ज आहे. गेल्या मोहिमेतून धडा घेत, या अभियानात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. चांद्रयान 3 च्या सुरक्षित लँडिंगवर इस्रोचे माजी शास्त्रज्ञ वाय.एस. राजन म्हणाले की, या मोहिमेत सुमारे ८० टक्के बदल करण्यात आले आहेत. चांद्रयान-३ मोहिमेत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
आधीच्या आपयशातून धडा घेत हे बदल करण्यात आले आहेत. चंद्रावर उतरताना उंची मोजण्यासाठी अल्टिमीटर असून आता त्याला वेग मीटर देखील जोडले आहे, ज्याला डॉप्लर म्हणतात. यामुळे यानाच्या संगणकाला उंची आणि वेग कळणार असून याचे गणित करून हे यान स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार आहे.
चार वर्षांपूर्वी ७ सप्टेंबर २०१९ रोजी चांद्रयान २ चंद्रावर कोसळले होते. लँडर ‘विक्रम’ च्या ब्रेक यंत्रणेतील बिघाडामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले होते. इस्रोचे तत्कालीन प्रमुख के. सिवन यांनी शेवटचा १५ मिनिटांच्या थराराचे वर्णन केले होते. यावेळी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला इस्रोने ‘थरारक १७ मिनिटे’ असे संबोधले आहे.
इस्रोच्या अधिकार्यांच्या मते, यंदा संपूर्ण लँडिंग प्रक्रिया ही स्वतंत्र असेल. ज्यात यानाचे संगणक लँडरला योग्य वेळी आणि योग्य उंचीवर आपले इंजिन फायर करण्याचे आदेश देतील. तसेच यानाला योग्य प्रमाणात इंधन देखील वापरावे लागणार आहे.
चंद्रावर उतरण्यासाठी डोंगराळ भाग किंवा खड्डा तर नाही ना, याची यानाला खात्री करावी लागणार आहे. सर्व बाबीं तपासल्यानंतर आणि लँडिंगचा निर्णय घेतल्यानंतर बेंगळुरूजवळील ब्यालालू येथे इंडियन डीप स्पेस नेटवर्कवरून निर्धारित लँडिंगच्या काही तास आधी ISRO सर्व आवश्यक कमांड LM वर अपलोड करणार आहे.
इस्रोच्या अधिकार्यांच्या मते, लँडिंगसाठी सुमारे ३० किलोमीटर उंचीवर, विक्रम पॉवर ब्रेकिंग टप्प्यात प्रवेश करेल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्याचा वेग हळूहळू कमी करण्यासाठी त्याचे चार थ्रस्टर इंजिन रेट्रो-फायरिंग करतील. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, यंदा हे यांन क्रॅश होणार नाही, कारण यावेळी चंद्राचे गुरुत्वाकर्षण देखील लॅंडींग साठी मदत करणार आहे. ते म्हणाले की सुमारे ६.८ किमी उंचीवर पोहोचल्यावर केवळ दोन इंजिन वापरण्यात येतील आणि उर्वरित दोन बंद होतील.
ज्याचा उद्देश लँडरला ‘रिव्हर्स थ्रस्ट’ देणे हा आहे, सुमारे १५०-१०० मीटर उंचीवर यान पोहोचल्यावर, लँडर आपले सेन्सर आणि कॅमेरे वापरून पृष्ठभाग स्कॅन करून लॅंडींग साठी योग्य जागा शोधणार आणि त्यानंतर योग्य जागा पाहून लॅंडींग प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.