क्राईम
ब्रेकिंग! उच्च शिक्षित कोमलने दोन लेकरांचा केला खून

- कौटुंबिक वाद किती विकोपाला जाऊ शकतात आणि त्यामधून किती भयानक घटना घडू शकतात यांची प्रचिती देणारी अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे. दौंडमधील स्वामी चिंचोली गावामध्ये एका उच्च शिक्षित महिलेने स्वत:च्या पोटच्या अवघ्या एक आणि तीन वर्षांच्या दोन लेकरांचा गळा आवळून त्यांचा निर्दयीपणे खून केला.
- त्यानंतर पतीवर देखील कोयत्याने वार करीत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम खळबळ उडाली आहे.
- मुलगा शंभू दुर्योधन मिंढे (वय ०१) आणि मुलगी पियू दुर्योधन मिंढे (वय ०३) अशी खून झालेल्या मुलांची नावे आहेत. तर तिच्या हल्ल्यात पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दौंड पोलिसांनी कोमल दुर्योधन मिंढे (वय ३०) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुर्योधन यांच्या मानेवर व हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्योधन व्यवसायाने आयटी अभियंता आहेत. ते पुण्यामधील खराडी परिसरात असलेल्या एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात. सध्या ते ‘वर्क फ्रॉम होम’ असे काम करीत होते. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे त्यांचे घर असून तेथेच हे कुटुंब राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री जेवणानंतर नेहमीप्रमाणे सर्वजण झोपले होते. आज पहाटे कोमलने आधी शंभू आणि पियू या दोन्ही मुलांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर, झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने हल्ला चढवला. या घटनेमुळे आरडाओरडा झाला. दुर्योधन यांचे आई-वडील, भाऊ झोपेतून जागे झाले. आसपासचे लोक जमा झाले.
- गंभीर जखमी असलेल्या दुर्योधन यांना तातडीने बारामतीमधील एका खासगीरुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. या घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, सहायक फौजदार गोरख मलगुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करीत दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. दरम्यान, आरोपी कोमल हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडे या घटनेबाबत कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुलांचे खून आणि पतीवर प्राणघातक हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, ही घटना कौटुंबिक वादामधून घडली असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.