राजकीय
ब्रेकिंग! दीपोत्सवावरून ठाकरे गट आक्रमक

- विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निवडणुकीत रंगत आली आहे. राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या सुरुवातीलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमित माहिम मतदार संघातून आपली पहिलीच निवडणूक लढवत आहेत.
- मात्र त्यांच्या एका कृतीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्षांना याचे काटेकोरपणे पालन करावे लागते. दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून अमित ठाकरेंविरोधात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते व सचिव अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेऊन याबाबत तक्रार दिली आहे. छत्रपती शिवाजी पार्क, दादर येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगीबाबत तसेच या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहिम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे हे उपस्थित राहिल्याने सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, या मागण्यांसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.



