राजकीय
रस्ते दुरुस्तीसाठी कर्नाटक सरकारकडे पैसे नाहीत आणि…

राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना साधे रस्ते देखील चांगले देऊ शकले नाहीत. कर्नाटक सरकारकडे रस्ते दुरुस्त करायला पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करताहेत, अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये कन्नड भवन उभारण्यात येणार आहे. डॉ. जगदेवी लिगाडे या नावाने हे कन्नड भवन उभारण्यात येणार असून, त्यासाठी बोम्मई यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबाबत बोम्मई यांनी माहिती दिली. त्यावर केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कोणत्यातरी धरणाचं पाणी, काही गावांना सोडल्याने सीमा प्रश्न सुटत नसतो. कर्नाटकने सीमा भागातील नागरिकांना गेली कित्येक वर्षे कशाप्रकारे वागणूक देत आहे हे सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रात देखील आमचे राज्य आहे. आम्ही देखील त्यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालू शकतो. मात्र आम्ही तसं करणार नाही, असे केसरकर यांनी म्हटले.



