सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! बंदूक्याने केला भाजीवाल्या महिलेचा खून

सोलापूर (प्रतिनिधी) शहरातील एका ६० वर्षीय महिलेचा सोन्याच्या दागिन्याच्या हव्यासातून गळा आवळून खून केला. या हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह लांबोटी पूलावरून सीना फेकून दिला. या गुन्ह्यात आजमिती अखेर विधी संघर्ष बालकासह अन्य दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालंय. आरोपीत दाम्पत्यास न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयानं दीपक धोंडीबा साळुंखे उर्फ बंदूक्या (वय-४० वर्षे ) व त्याची पत्नी अर्चना दीपक साळुंखे (वय-३४,दोघे रा.जय मल्हार नगर,बाळे) यांना ०५ दिवसांची पोलीस कोठडी दिलीय तर विधी संघर्षग्रस्त बालकाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
जोडभावी पेठ पोलीसांनी प्रारंभी मिसींग म्हणून दाखल असलेल्या साळूबाई नामदेव वाघमोडे या ६० वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
उभयतांची कसून चौकशी करता,त्यांनी दिलेल्या कबुली जवाबानुसार त्यांनी साळुबाईची सोन्याच्या दागिन्यासाठी हत्या करून तिचा मृतदेह विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने रिक्षामधून लांबोटी पुलावर नेऊन सीना नदीच्या पात्रातील वाहत्या पाण्यात फेकल्याचे सांगितले.
त्यानुसार प्रारंभी दीपक याला तर त्यानंतर त्याच्या पत्नीस अटक करून रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले होते. सत्र न्यायाधीश व्ही.पी.कुंभार यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.यात अॅड.आनंद काळे यांनी सरकार पक्षातर्फे तर आरोपीतर्फे अॅड.रविराज सरवदे यांनी आपली बाजू मांडली.
२५ जुलै रोजी दुपारी तीन वाजता कस्तुरबा मंडळीत भाजी विकणारी साळुबाई नागेश वाघमोडे ही महिला गायब झाल्याची तक्रार तिच्या मुलाने केली होती. त्या अनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास करत असता सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, प्रारंभी रिक्षा क्रमांक एम.एच.१३.सीटी.५४८२ या रिक्षाचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर तपासात त्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपीस व त्याच्या बायकोस ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला. या प्रकरणात किती तोळे दागिने चोरले,त्यातील किती जमा झाले? चोरलेले दागिने कोणत्या सोनाराकडे विकले? तसेच हे दागिने कोण विकले? या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याची माहिती आता तपासातून पुढे येणार आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण या घटनेचा तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button