सोलापूर

सिने पत्रकारितेत करिअरच्या मुबलक संधी

सिने पत्रकारितेत ग्लॅमर, थ्रील आहे. मुख्य प्रवाहातील पत्रकारितेपेक्षा ही पत्रकारिता वेगळी आहे. मनोरंजन क्षेत्रातील कंटेंटला माध्यम क्षेत्रात सध्या मोठी मागणी आहे. हे काम आवडीने आणि समर्पितपणे करणाऱ्याला सिने पत्रकारितेत करिअरच्या मुबलक संधी आहेत, असे प्रतिपादन सिने पत्रकार रेश्मा खान यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागात रेश्मा खान यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक, प्रियांका लगशेट्टी उपस्थित होते.

रेश्मा पुढे म्हणाल्या की, चित्रपट सृष्टीतील प्रेम प्रकरणे प्रसिद्ध करणे म्हणजे सिने पत्रकारिता नव्हे. चित्रपट, मालिका, ओटीटी, नाटक याचाही मनोरंजन पत्रकारितेत समावेश होतो. ही पत्रकारिता अतिशय जबाबदारीने करावी लागते. सकारात्मकता, मानवीय दृष्टीकोन, नाविन्याचा शोध घेणारे पत्रकारच या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. कलाकारांच्या मुलाखती, पुरस्कार सोहळे, फिल्म रिलीज, गॉसिप, कलाकारांच्या आयुष्यातील सुख दुःखाचे प्रसंग आदी अनेक मुद्द्यांवर लिहावे लागते.

मुद्रित माध्यमे बंद पडणार, अशी चर्चा होत असली तरी जोपर्यंत वाचकांचा वृत्तपत्रांवर विश्वास आहे तोवर ही माध्यमे जिवंत राहतील. मुद्रित माध्यमांचे सादर होण्याचे स्वरूप बदलेल, मात्र मुद्रित माध्यमे बंद पडणार नाहीत. अलीकडील काळात डिजिटल मीडियामध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. डिजिटल मीडियामध्ये मनोरंजनात्मक आणि राजकीय कंटेंट सर्वाधिक वाचला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या कंटेंटला मोठी मागणी आहे. इतरांपेक्षा वेगळा आणि स्पेशल कंटेंट देणारे पत्रकारच आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात.

सिने पत्रकारिता करीत असताना प्रचंड आत्मविश्वास, चेहऱ्यावर हास्य आणि या क्षेत्रातील घटना-घडामोडींबाबत सतत अपडेट असणे गरजेचे आहे. ही पत्रकारिता करत असताना जास्त वाचक किंवा दर्शक मिळविण्याच्या नादात सिने कलाकारांचे खासगी आयुष्य धोक्यात येणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. चांगला जनसंपर्क असणारे पत्रकार यामध्ये यशस्वी होतात.

भगव्या रंगावरून होणाऱ्या वादाबाबत बोलताना खान म्हणाल्या की, निसर्गातील विविध रंग ही निर्मिकाची देण आहे. रंगाचा धर्माशी संबंध जोडून ट्रोल करणे चुकीचे आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा कृती ही अशोभनीय आहे. आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीला मोठी परंपरा आहे. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. ती एक कलाकृती असते. चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असले तरी त्याला जगण्याची प्रेरणा मिळते. त्याच्यात सामाजिक भान निर्माण होत असते.
प्रारंभी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी रेश्मा यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले. यावेळी एम.ए. मास कम्युनिकेशन, बी. व्होक जर्नालिझम, पी. जी. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button