सोलापूर
गरीब विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी तीन कोटींची शिष्यवृत्ती
सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे संचलित विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक रवींद्र कर्वे यांना श्रीमान भाऊसाहेब गांधी सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल वीरशैव व्हिजनतर्फे सत्कार करण्यात आला.
सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे या संस्थेच्या विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील गरीब, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून 1500 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यावर्षी 300 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. प्रतिवर्षी 3 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम शिष्यवृत्तीद्वारे वितरित केली जाते. या योजनेसाठी राज्यभरातील दानशूर व्यक्ती, उद्योजक निधी देत असतात.
याची दखल सोलापुरातील श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानने घेतली. श्रीमान भाऊसाहेब गांधी सेवाभावी पुरस्कार देऊन रवींद्र कर्वे यांना नुकतेच गौरविण्यात आले. वीरशैव व्हिजनने या संस्थेकडून सोलापुरातील 3 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. शैक्षणिक शिष्यवृत्ती सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल वीरशैव व्हिजनच्या वतीने श्री कर्वे यांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी विद्यार्थी विकास योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक माधव देशपांडे, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. संजय मठ, जनसंपर्क अधिकारी सुधीर जोगीपेठकर, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, सहकोषाध्यक्ष विजय बिराजदार, सचिन विभुते उपस्थित होते.