- सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे सात तालुक्यातील 92 गावे बाधित झालेल्या असून हजारो कुटुंब बाधित झालेली आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने या सर्व कुटुंबांना जेवण, पाणी, आरोग्य तसेच जनावरांसाठी चारा अशा प्रकारची मदत तात्काळ सुरू केलेली आहे. परंतु अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची घरांचे, शेती पिकांचे व जनावरांचे नुकसान झालेले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी बँका, खाजगी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना जेवढी शक्य असेल ती मदत बाधित नागरिकांसाठी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
- जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पूरग्रस्त बाधित नागरिकांना मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व सहकारी बँकेचे चेअरमन, मुख्याधिकारी तसेच खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा प्रतिनिधी यांच्या समवेत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, जिल्हा सहकारी उपनिबंधक किरण गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, रोहयो उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व सहकारी खाजगी व राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
- जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, ज्या बँकांना आर्थिक स्वरूपात मदत करायची आहे, त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करावी. तसेच ज्या बँकांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य किटच्या रूपात मदत उपलब्ध करून द्यायचे असेल त्यांनी जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय मदत कक्षाकडे आपली मदत पाठवावी. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. त्यामुळे सर्व बँकांनी सढळ हाताने मदत देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
- जिल्ह्यातील नुकसानग्रस्त व पुरग्रस्तांच्या सार्वजनिक हितासाठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यांत या उद्देशाने मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, मदत कक्षामार्फत आवश्यक ती मदत करुन बाधित नागरिकांचे प्रश्न तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधून सोडविण्यात येतील. या मदत कक्षाच्या माध्यमातून 92 बाधित गावांपैकी कोणत्या गावाला कोणत्या प्रकारची मदतीची आवश्यकता आहे याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे गरजू बाधितग्रस्तांना केलेली मदत तात्काळ देणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
- यावेळी उपस्थित सर्व सहकारी बँका खाजगी बँका व राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधी यांनी पूरग्रस्त बाधित नागरिक व गावांना मदत देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सहकारी बँकांसाठी जिल्हा उपाधिबंधक किरण गायकवाड तर खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांसाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे हे समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत.
- जिल्हास्तरीय मदत कक्ष अधिकारी व संपर्क क्रमांक :-
- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार सैपन नदाफ मोबाईल क्रमांक 83799 81799 तर दूरध्वनी क्रमांक 0217-2990140 यावर संपर्क साधावा.
- तालुकास्तरीय मदत कक्षाचे अधिकारी व संपर्क क्रमांक:-
- उत्तर सोलापूर तालुक्यात सुधाकर बंडगर, निवडणूक नायब तहसिलदार, मोबाईल क्रमांक 9881741311, कार्यालयीन क्रमांक 0217-2731014; माढा तालुक्यात श्री प्रितम पवार, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9970827574, कार्यालयीन क्रमांक 02183-234031; करमाळा तालुक्यात श्री शतुघ्न चव्हाण, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 8805907686, कार्यालयीन क्रमांक 02182-220535; बार्शी तालुक्यात श्री संतोष गुलाब शिंदे, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9518562532, कार्यालयीन क्रमांक 02184-222213; अपर तहसिल मंद्रुप येथे श्री नवल सरवळे, सहा. महसूल अधिकारी, मोबाईल क्रमांक 9309597368; दक्षिण सोलापूर तालुक्यात श्री विनायक कुलकर्णी, निवडणूक नायब तहसिलदार, मोबाईल क्रमांक 9423331657, कार्यालयीन क्रमांक 0217-2731033; तर मोहोळ तालुक्यात श्रीमती सोनाली निटुरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, मोबाईल क्रमांक 9022008681, कार्यालयीन क्रमांक 02189-232234. नागरिकांनी पूरग्रस्त मदतीसाठी संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
- या किटमध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा.
- ज्वारीचे पीठ, आटा, हरभरा दाळ, स्वयंपाक तेल, मीठ, तिखट मसाला, हळद, दूध पावडर, मेणबत्ती पाकीट मध्यम आकाराचे, मच्छर आगरबत्ती, काडीपेटी, टॉर्च विथ बॅटरी, इमरजन्सी लाईट,अंगाचे साबण, प्लास्टीक ताडपत्री, चादर, सतरंजी तसेच पातेला, तवा, ताट, तांबे, वाटी, चमचा, ग्लास, उलतन, पक्कड/सांडशी, पळी (आमटी वाढण्यासाठी), प्लास्टीक बकेट अशा आवश्यक मूलभूत वस्तूंचा समावेश आहे. परंतु ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी या वस्तू व्यतिरिक्तही मदत देऊ शकतात.
ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती
