मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. एकाच दिवसात 113 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसामुळे मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली येथे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. त्यासोबतच जीवितहानी झाली. 15 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
शेकडो जनावरे दगावली आहेत. शनिवारपासून सुरु झालेल्या पावसाचे आज देखील गडद सावट आहे. नदी, नाले, ओढे तुडूंब भरुन वाहत आहेत. जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. बिंदुसरा धरणाच्या पाणी सांडव्यातून पाडणाऱ्या पाण्याने रौद्र रूप धारण केले आहे. प्रशासनाने धरण परिसरात जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निपाणी गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे वैतागले आहेत. शेतातील पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि शासन काहीच मदत करत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टाहो फोडला आहे.