कोल्हापूरच्या नांदणी गावातील 8 वर्षीय स्वरा देसाईने अपहरणाच्या प्रकरणात धाडस दाखवत स्वतःचा आणि भावाचा जीव वाचवला आहे.
तिच्या साहसाचे स्थानिक तसेच सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. माहितीनुसार, स्वरा संध्याकाळच्या सुमारास लहान भावासह दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती. दरम्यान अंधाराचा फायदा घेत गावातील रस्त्यावर जात असताना पाच अनोळखी व्यक्ती अचानक तिच्या मागे आले. त्यांनी दोघांचे तोंड दाबत त्यांना उचलून नेण्याचा प्रयत्न केला.
घाबरत न जाता स्वराने धाडस दाखवत अपहरणकर्त्याच्या हाताला जोरात चावा घेतला आणि जोरात आरडाओरडा केला. तिच्या प्रतिकारामुळे घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी दोघांना सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.
घटनास्थळी मुलांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक धावून आले. त्यांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधारामुळे ते फरार झाले.
स्वराच्या धैर्यामुळे भावाचे प्राण वाचलेआणि तिचे हे साहस प्रेरणादायी ठरले आहे. शिरोळ पोलिस ठाण्यात संबंधित गुन्ह्याची नोंद झाली असून, पोलीस सीसीटीव्ही आणि अन्य तपास पद्धतींचा आधार घेत आरोपींचा शोध घेत आहेत.