मराठवाड्यातील लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालिका अर्चना सुरेश कुटे हिला अखेर सीआयडीने अटक केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून अर्चना फरार होती. सीआयडीच्या पथकाने पुणे येथून बाणेर परिसरातून तिला ताब्यात घेतले.
या प्रकरणात सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे याला यापूर्वीच अटक झाली आहे. अर्चना ही त्याची पत्नी असून संचालिका मंडळाविरुद्ध एकूण 95 गुन्हे दाखल आहेत. या फसवणुकीत आशा पाटोदेकर हिलाही अटक करण्यात आली आहे. बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधील अनेक ठेवीदारांना या घोटाळ्याचा फटका बसला आहे.
सीआयडीने अर्चना व पाटोदेकर यांच्या मालमत्तेवर कारवाई केली असून, 80 लाख 90 हजार 950 रुपयांचे सोने (60 नग), 56 लाख 75 हजार 500 रुपयांचे चांदी (270 नग), 63 लाख रुपयांची रोकड, 10 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार आणि स्कुटी अशी मिळून 2 कोटी 10 लाख 75 हजार 320 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याशिवाय ईडीने 333 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
सुरेश आणि अर्चना यांनी ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी’च्या माध्यमातून तब्बल 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून पैसे जमा केले. मात्र, आयकर विभागाने कुटे ग्रुपवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात करचोरी उघडकीस आली. त्यानंतर ठेवीदारांना परतावा मिळणे बंद झाले. कुटे ग्रुपकडून “लोन मंजूर झाले आहे, घाबरू नका” असे सांगत दिशाभूल केली जात होती. पण प्रत्यक्षात कोणतीही रक्कम परत करण्यात आली नाही.
या घोटाळ्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, पुणे अशा ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. एकूण 13 संचालकांपैकी 9 जणांना अटक झाली असून अजून 19 आरोपी फरार आहेत.