पुण्यात काल रात्री रक्तरंजित थरार घडला. नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या वर्षश्राद्धाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीने बदला घेतल्याचे चित्र उभे राहिले आहे. या संघर्षात गणेश कोमकरचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर (वय 18) याचा खून करण्यात आला.
काल रात्री साडेसातच्या सुमारास आयुष क्लासवरून घरी परतला होता.
नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये उभा असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला आंदेकर टोळीने केला असल्याची माहिती समोर आली आहे.
एक सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेत वनराज यांची निर्घृण हत्या झाली होती. कोयत्याचे वार आणि गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आले होते. वनराज यांच्या अंत्यविधीला आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्याचाच परिणाम म्हणून एक वर्ष उलटताच आयुष कोमकरचा बळी गेला असे दिसते.