क्राईम

नवरा घरी नाही, तुम्ही भेटायला या!

  • एका सराफा व्यावसायिकाला (वय ५२) खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची भीती दाखवत त्याची तब्बल 18 लाख 74 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी एका जोडप्याला पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
  • अकोला शहरातील रहिवासी असलेले फिर्यादी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत पैसे जमा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची ओळख मूर्तीजापूर तालुक्यातील खरब ढोरे गावातील लता नितेश थोप या महिलेशी झाली. ओळखीच्या माध्यमातून तिने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळवला व त्यांच्याशी वारंवार संपर्क साधू लागली. लता हिने पती घरी नसल्याचे सांगत फिर्यादीला आपल्या घरी बोलावले. फिर्यादी दुपारी तिच्या घरी पोहोचले असता अचानक तिचा पती नितेश तिथे येऊन पोहोचला आणि त्याने त्या दोघांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यानंतर या दाम्पत्याने फिर्यादीस बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच हे फोटो समाजात व नातेवाईकांमध्ये प्रसारित करण्याची भीती दाखवून सुरुवातीला तीन लाख रुपयांची मागणी केली.
  • फिर्यादीने भीतीपोटी त्यावेळी तीन लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही वेळोवेळी धमक्या देत या जोडप्याने आणखी रक्कम उकळत एकूण 18 लाख 74 हजार रुपये वसूल केले. तरीही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा पाच लाख रुपयांची मागणी केली. यावेळी मात्र फिर्यादीने मूर्तीजापूर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
  • फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि मूर्तीजापूर-अकोला रोडवरील टोल नाक्यावर आरोपींना पैसे घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लता व नितेश या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button