राज्यात काही दिवसांपासून आत्महत्या आणि हत्येचे सत्र सुरूच आहे. एका प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी तरुणाने आधी प्रेयसीच्या काकाची हत्या केली आणि तुरुंगातून सुटल्यानंतर प्रेयसीचाही खून केला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी गावातील अर्चना नाईक (वय ३६) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे तर दत्ताराम पिंगळा असे आरोपीचे नाव आहे. अर्चना आणि दत्ताराम यांच्यात काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते आणि त्यांना लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, अर्चनाच्या काकांनी या नात्याला तीव्र विरोध केला होता. त्यांनी अर्चनाचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी लावून दिले. याचा राग मनात धरून दत्तारामने अर्चनाच्या काकाची हत्या केली होती. या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
यानंतर काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटल्यानंतर दत्तारामने पुन्हा अर्चनाला भेटण्याचा प्रयत्न केला. तो तिच्या आईच्या घरी गेला आणि पुन्हा नातेसंबंध सुरू करण्याबाबत विचारणा केली. मात्र, अर्चनाचे लग्न झाले असल्याचे सांगत नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, दत्तारामने दोरीने अर्चनाचा गळा आवळून तिची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अर्चनाची बहीण दर्शना नाईक हिच्या तक्रारीवरून दत्तारामला अटक केली आहे.