राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांच्या धडाडीच्या आणि थेट कामकाजाच्या शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, काल त्यांचा एक व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यातून त्यांनी करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांच्याशी केलेल्या कठोर संवादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अजितदादा यांनी बेकायदेशीर उत्खननास पाठबळ दिल्याचा तसेच महिला अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
कुर्डू (ता. माढा, जि. सोलापूर) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या असताना अजितदादा यांनी त्यांना थेट फोन केला. मात्र, फोनवर ओळख न लागल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट व्हिडिओ कॉल केला आणि अधिकाऱ्यांना खडसावल्याचा आरोप अजितदादा पवारांवर होत आहे.
शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी म्हटले की, अजित पवारांनी फोन केल्यानंतर गावातील काही स्थानिक गुंडांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून हुसकावून लावले. तेथे दोन तलाठ्यांवरही हल्ला करण्यात आला. तब्बल तीन तास गावात गोंधळाची स्थिती होती. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून चुकीच्या कामासाठी दबाव येतो, हे दुर्दैवी आहे. त्यांनी तातडीने माफी मागून राजीनामा द्यावा.
या प्रकरणात आठ दिवसांत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर हजारो शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खुपसे यांनी दिला आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर अजित पवारांच्या भूमिकेवर टीका होत असून महिलाविरोधातील वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक गट आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान, अजित पवार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.