भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानच्या नव्या निर्णयामुळे आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने देशभरातील अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्यासाठी एक नोटम जारी केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान येत्या काही दिवसांत मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीची किंवा एअर-डिफेंस लष्करी सरावाची तयारी करत असल्याच्या अटकळींना उधाण आले आहे.
भारताने अलिकडेच अग्नि-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नेमके याच वेळी पाकिस्तानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आपल्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या यशाचा आनंद साजरा करत असताना पाकिस्तानने आपले हवाई मार्ग बंद करण्याचा घेतलेला निर्णय असुरक्षितता आणि भीतीची प्रतिक्रिया असल्याचे बोलले जाते आहे.
पाकिस्तानने जाहीर केले आहे की, इस्लामाबाद आणि नियंत्रण रेषेभोवतीचे हवाई क्षेत्र 22 ऑगस्ट रोजी सकाळी रात्री 00:00 ते पहाटे 02:30 पर्यंत बंद राहील. या काळात नागरी हवाई वाहतूकीला या मार्गांवरून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दक्षिण भागातील लाहोर ते रहिमयार खान, कराची आणि ग्वादर पर्यंतचे अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग 26 ऑगस्ट रोजी रात्री 00:30 वाजेपर्यंत बंद राहतील.