स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. यावेळी सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे विरुद्ध दिशेने जाणार्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांना थांबून परत पाठवले. अशा वेळी एका थारचालकाने पोलिसांना न जुमानता वेगाने विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.
करण रामदास महाडिक (वय २५, रा. कुमार मिडोज, मांजरी) असे या थार चालकाचे नाव आहे.
याबाबत साखरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारी रात्री दहा ते शुक्रवारी पहाटे २ वाजेपर्यंत कॉम्बींग ऑपरेशन घेण्यात येत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार राऊत, चव्हाण, केसकर, हिरवे, चोरमले हे कॉम्बींग ऑपरेश करीत रवी दर्शन चौकात आले.
त्यावेळी पुण्याहून सोलापूरकडे मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने वाहने जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे विरुद्ध दिशेने येणार्या वाहनांस पुन्हा माघारी पाठवून वाहतूक सुरळीत करीत ते सिद्धेश्वर पेट्रोल पंपाजवळ आले. त्यावेळी एक थार गाडी भरधाव वेगाने वाहतुकीस अडथळा करीत व धोकादायक स्थितीने गाडी चालवत त्यांच्या दिशेने आली. गाडीचालक व त्याचे दोन साथीदार गाडीत होते. त्यांना थांबवून विरुद्ध दिशेने गाडी चालवू नका, वाहतुकीला अडथळा होत आहे, असे सांगितले.
तरीही चालकाने काही एक न ऐकता गाडी भरधाव चालवत विरुद्ध दिशेने जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन अडविले. त्याला पोलिसांनी विचारणा केली तर त्याने ‘‘ तुम्हालाा काय पावती टाकायची आहे ती टाका ’’, असे उद्धटपणे उत्तर दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीसह चौकशीसाठी हडपसर पोलीस ठाण्यात आले. करण महाडिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहे.