रविवारी खेळल्या गेलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्याच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत केले. या पराभवा नंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे पाकिस्तानचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. इंग्लंडने या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. या सामन्यात स्ट्रोकने केलेली कामगिरी महत्त्वाची ठरली. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला असला तरी याचे पडसाद भारतात उमटले आहेत.
पाकिस्तानच्या पराभवा नंतर पंजाब राज्यात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. एका खाजगी महाविद्यालयात ही घटना घडली आहे. लाला लजपतराय महाविद्यालयातील काश्मीर मधील विद्यार्थी व बिहार तसेच अन्य राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली आहे. फायनलचा सामना संपल्यानंतर काही विशिस्ट समुदायाशी जोडलेले विद्यार्थी पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात समर्थन करत होते. पुढे अन्य राज्यातील विद्यार्थी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत होते. दरम्यान हा वाद इतका वाढला की दोघा गटांकडून दगडफेक सुरू झाली. पाकिस्तान जिंदाबाद या गोष्टीला विद्यार्थ्यांनी विरोध केला.
त्यातून हा वाद विकोपाला गेला. मात्र आता येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही विद्यार्थ्याला गंभीर इजा झाली नाही. दरम्यान या घटनेनंतर महाविद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप बिहार राज्यातील विद्यार्थ्यांनी केला आहे.