भाजपचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे सोलापुरातून फिल्मी स्टाइल अपहरण झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याच्या उद्देशाने अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेची तत्काळ दखल घेत पोलिसांनी शोध सुरू केला. त्यामुळे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. शरणू हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मु्ख्य संशयित आरोपी अमित सुरवसे याने 2021 मध्ये पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. याचा बदला म्हणून काही दिवसांपूर्वी शरणू याने अमितला मारहाण केली होती, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. या मारहाणाची व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोघांनीही आपसातील वाद मिटवला होता. परंतु, याच वादामुळे शरणूचे अक्कलकोट रोडवरील साईनगर येथून अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शरणू याचे अपहरण नेमके कोणत्या कारणामुळे झाले, यामागे जुन्या वादाची काही पार्श्वभूमी आहे का याची माहिती पोलीस तपासातून समोर येईल. परंतु या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.