- पुण्यातील हडपसर परिसरात एका ३३ वर्षीय तरुणाचा लोखंडी रॉडने निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेची माहिती पोलिसांना देणारा किसन राजमंगल सहा (वय २०, मूळ बिहार) हा तरुणच खून करणारा आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.
- रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडे पाचच्या सुमारास किसन सहा याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, उंद्री-हांडेवाडी येथील साईगंगा सोसायटीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये तीन-चार अनोळखी व्यक्तींनी रविकुमार याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. पोलिसांची टीम काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी अवस्थेत आढळलेल्या रविकुमार यादव याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
- माहिती देणारा किसन सहा याच्यावर पोलिसांनी संशय घेत चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने सांगितले की, गादी व बेडशीट मागण्यावरून काही अनोळखी व्यक्तींसोबत वाद होऊन हल्ला झाला. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासूनही अशा कोणत्याही व्यक्तींची हालचाल आढळून आली नाही. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्तीतून चौकशी केली असता, किसन याने अखेर खुनाची कबुली दिली.
- पोलिसांच्या माहितीनुसार, रविकुमार आणि किसन दोघेही दारू पित बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात किसन याने लोखंडी रॉड उचलून रविकुमारच्या डोक्यात घातला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर पोलिसांना चुकीची माहिती देऊन तपास दुसऱ्या दिशेने वळवण्याचा किसनने प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत सत्य उघडकीस आणले.
पुण्यात तरुणाचा खून
