राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांचा ‘खळ-खट्याक’

Admin
1 Min Read

पनवेलमध्ये काल झालेल्या शेकापच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अनधिकृत डान्स बारांवर तीव्र रोष व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केले होते. छत्रपतींच्या राजधानीत अनधिकृत बार कसे सुरू राहतात? असा सवाल करत ठाकरेंनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला इशारा दिला होता.

या भाषणानंतर अवघ्या काही तासांत मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले. शनिवारी मध्यरात्री 12 वाजता पनवेल तालुक्यातील कोनगावातील ‘नाईट रायडर’ या लेडीज सर्व्हिस बारवर मनसेने धडक कारवाई करत फोडाफोड केली. या कारवाईमुळे संबंधित बार रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असल्याचेही उघड झाले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या या कारवाईत बारमधील फर्निचरची तोडफोड करण्यात आली. यामुळे रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अनधिकृत बार व्यवसायावर मनसेने थेट आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित करत अमराठी बार मालकांविरोधातही नाराजी व्यक्त केली होती. मनसेची मध्यरात्रीची ही कृती त्यांच्या इशाऱ्याचे त्वरित पडसाद म्हणून पाहिली जात आहे. या घटनांमुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अनधिकृत बारवर काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article