- व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून दौंडच्या यवतमध्ये दोन गट भिडलयाचे वृत्त समोर आले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- याबाबत दौंडचे आमदार राहुल कूल यांची प्रतिक्रिया समोर आली असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तणावाची परिस्थिती होती. तणाव निवळावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, आज दोन गट भिडल्याने यवतमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- एकीकडे आक्षेपार्ह पोस्टवरून तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे गावातील काही तरूणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. काल यवतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची सभा पार पडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन गट आमने सामने भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी येथील नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतरदेखील गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
- दरम्यान गावातील वाढता तणाव लक्षात घेता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सदर प्रकार अत्यंत गंभीर असून कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.
ब्रेकिंग! पुण्याच्या यवतमध्ये दोन गट भिडले, जोरदार दगडफेक, घराची तोडफोड
