- पुण्यात कोयता गँगची दहशत वारंवार चर्चेत असतानाच भवानी पेठ परिसरात पुन्हा एकदा कोयत्याच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या टोळक्याचा प्रकार समोर आला आहे. “आम्हीच इथले भाई” म्हणत काही तरुणांनी किरकोळ कारणावरून थेट रस्त्यावर उतरत हिंसाचार केला. सुमारे 10 ते 12 दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार तोडफोड केली.
- ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, काही तासांतच हा वाद गंभीर रूप धारण करत हिंसक वळणावर गेला. संतप्त झालेल्या तरुणांनी हातात कोयते, तलवारीसारखी धारदार शस्त्रं घेत थेट रस्त्यावर उतरून परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला चढवत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.
- सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण “आम्हीच इथले भाई, आमच्या नादी कोणी लागू नये” अशा शब्दांत धमकी देत परिसरात खुलेआम दहशत माजवत असल्याचे दिसून येत आहे.
- या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी बंदोबस्त वाढवून नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून दहशत माजवणाऱ्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.
आम्हीच इथले भाई, नादी लागायचं नाही
