राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. या युतीबाबत उद्धव सकारात्मक आहेत. मात्र राज यांनी सावध भूमिका घेतली आहे. विजयी मेळावा हा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही, असे राज यांनीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज यांनी सध्याच्या घडामोडींवर भूमिका स्पष्ट केली आहे.
काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातले काही प्रसिद्ध केलेच तर जे बोलले नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचे नसते हे भान पण आता गेले आहे का? युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाही, असे समजू नका.
पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.