क्राईम
बिहारमधून सात महिन्याच्या बालकाचे अपहरण; मोबाइल लोकेशन सापडले पुणे रेल्वे स्थानक

- बिहारच्या हाजीपूर येथून अपहरण करण्यात आलेल्या केवळ सात महिन्याच्या बालकाची पुणे रेल्वे स्थानकावरून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दल पुणे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे.
- पुणे रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीआरपी हाजीपूर व विभागीय नियंत्रण कक्षामार्फत प्राप्त सूचना आणि तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. एका पुरुष आणि एका महिलेकडून बिहारमधील हाजीपूर येथून सात महिन्याच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. तपासादरम्यान या दोघांचे मोबाइल लोकेशन पुणे रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे येथील RPF पथकाला तत्काळ सतर्क करण्यात आले.
- सूचना मिळताच पुणे ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली. विविध पथकांची स्थापना करून रेल्वे स्थानक परिसर, विशेषतः फलाट क्रमांक ३ आणि प्रवेश व निर्गम मार्गांवर निगराणी ठेवण्यात आली. तपासादरम्यान दोन संशयित व्यक्ती फलाट क्रमांक ३ वर आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पुणे येथे आणण्यात आले.
- चौकशीत त्यांनी आपली नावे मुन्ना कुमार राजभर (२४ वर्षे, रा. कोपा समोता, छपरा, बिहार) आणि पूनम देवी (३० वर्षे, रा. दया छपरा, सिवान, बिहार) अशी सांगितली. त्यांच्याकडे बालकाच्या ताब्याबाबत कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हते. त्यांचे आणि बालकाचे फोटो जीआरपी हाजीपूरला पाठविण्यात आले असता हे दोघेही अपहरण प्रकरणात वॉंटेड असल्याचे निष्पन्न झाले.
- यानंतर पूनम देवीला अटक करण्यात आली असून बालकाला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत दोघेही आरोपी आणि बालक RPF पुणे यांच्या ताब्यात असून हाजीपूर येथून पोलिस पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. हे पथक आरोपी आणि बालकाला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ताब्यात घेणार आहे.



