क्राईम
प्रेम प्रकरणातून खून!

- राज्यात प्रेम प्रकरणातून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तीन हल्लेखोरांनी एका हॉटेलमध्ये घुसून दोघांवर धारदार चाकूंनी वार करत एकाचा खून केला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर परिसरात ही घटना उघडकीस आली. विशाल मुंजाजी देवरे (रा. थोरावा, ता. वसमत) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो वसमत येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तर जखमी तरुणाचे नाव ओंकार नरवाडे असे असून त्याच्यावर सध्या नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि ओंकार हे रात्री हयातनगर पाटीजवळील एका हॉटेलमध्ये बसले होते. त्याचवेळी गोपाळ देवरे, ऋषिकेश कदम आणि शिवाजी देवरे (थोरावा गावचे) हे संशयित हल्लेखोर अचानक हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी दोघांवर चाकूने सपासप वार केले.
- विशालच्या पोटावर आणि छातीवर गंभीर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर ओंकारच्या पोटावर वार होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक तपासात विशाल याचे एका तरुणीवर प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच वाद निर्माण होऊन हा हल्ला झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिघेही आरोपी सध्या फरार असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत.



