क्राईम

इंस्टाग्रामवर चार दिवसांची ओळख; पाचव्या दिवशी भेटले

  • इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर केवळ काही दिवसांतच एका तरुणाने विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटक राज्यातील हसन आणि मंड्या जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आरोपी पुनीत याने महिलेची हत्या करून तिचा मृतदेह एका शेतात पुरला होता. पोलिसांनी मोबाईल नेटवर्कच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे.
  • मृत महिला प्रीती (३५) या हसन जिल्ह्यातील होसाकोप्पलु गावातील रहिवासी होत्या. त्या विवाहित असून काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांची पुनीत नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. आरोपी पुनीत हा मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघांची इन्स्टाग्रामवर चार दिवसांपूर्वी ओळख झाली आणि पाचव्या दिवशीच दोघांनी प्रत्यक्षात भेट घेतली. मात्र, या पहिल्याच भेटीत पुनीतने प्रीतीकडे नको ती मागणी केली. या मागणीला तिने विरोध करताच संतापलेल्या पुनीतने तिचा खून केला.
  • हत्या केल्यानंतर पुनीतने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि मृतदेह करोती गावातील आपल्या शेतात पुरून टाकला. दरम्यान महिलेच्या पतीने सोमवारी हसन पोलिस ठाण्यात प्रीती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार मंड्या जिल्ह्यातील एका शेतात मृतदेह सापडला. मंड्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दोघांची भेट झाली होती आणि शारीरिक संबंधावरून वाद झाल्यानंतर प्रीतीवर हल्ला करण्यात आला.
  • या प्रकरणात पुनीतला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात हसन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button