क्राईम
सुनेची ‘दृश्यम’ स्टाईल हत्या, बॉडी घराबाहेर गाडली

- हुंड्यासाठी एका लोभी कुटुंबाने सुनेची दृश्यम सिनेमातील खुनासारखी हत्या केली आहे. या कुटुंबाने त्यांच्या सुनेची हत्या करून तिला घरासमोरच पुरले. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
- या तक्रारीच्या दोन महिन्यांनंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी महिलेचा कुजलेला मृतदेह घराशेजारील दहा फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढला. मृत सुनेच्या सासऱ्याने या हत्येची कबुली दिली आहे.
- हरियाणातील फरिदाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 24 वर्षीय तनू सिंह या विवाहित महिलेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरासमोरून एका खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. तनू मुळची उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथील रहिवाशी होती. तिचे दोन वर्षांपूर्वी फरिदाबादच्या रोशन नगर येथील अरुण सिंहसोबत लग्न झाले होते.
- तनूचा सासरा भूप सिंह याने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21-22 एप्रिलच्या रात्री भूप सिंहने त्याची पत्नी सोनिया आणि मुलगा अरुण घरी नसताना तनुचा पहिल्या मजल्यावर गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह एका खड्ड्यात टाकला. हा खड्डा पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदण्यात आला होता. तनूची हत्या ‘दृश्यम’ चित्रपट पाहून केली आहे, असा दावा तिच्या माहेरच्यांचा आहे.
- तनूच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी तनुच्या सासरच्या लोकांनी त्यांना सांगितले होते की, तनू घरातून पळून गेली आहे. त्यानंतर तनूचे वडील हकीम सिंह तिच्या सासरच्या घरी गेले. त्यावेळी तनूचा नवरा आणि अन्य घरातील मंडळींनी त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती, असे त्यांना समजले.
- पोलिसांनी कोणतीही मदत केली नसल्याचा तनूच्या कुटुंबीयांचा आरोप होता. पण, पोलीस उपायुक्त उषा कंडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक आठवड्यापूर्वी औपचारिक तक्रार मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासा दरम्यान पोलिसांना सासरच्या लोकांवर संशय आला.
- तनूचे सासरे भूप सिंहने शौचालय बांधण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी घराबाहेर खड्डा खोदला होता. पोलिसांनी तो खड्डा पुन्हा खोदला असता त्यात महिलेचा मृतदेह सापडला. त्याानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत भूप सिंहने सुनेच्या हत्येची कबुली दिली.
- तनूची बहीण प्रीतीने दावा केला आहे की, अरुण आणि त्याच्या आई-वडिलांनी लग्नानंतर लगेचच सोन्याचे दागिने आणि पैशांची मागणी केली होती. त्यांच्या मागण्या सतत वाढत होत्या. त्यामुळे त्रस्त होऊन लग्नाच्या काही महिन्यांनंतर तनू घरी परतली होती. त्यानंतर तनू एका वर्षापेक्षा जास्त काळ माहेरी राहिली. शेवटी, कुटुंबांमध्ये समजूत काढल्यानंतर तनूला परत पाठवण्यात आले होते.
- त्यानंतर तिला आमच्याशी बोलू दिले जात नव्हते. प्रीतीने असेही सांगितले की, तनुच्या सासऱ्याने जबरदस्तीने तिचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये ती ‘मी घर सोडून जाईल,’ असे सांगत होती. या व्हिडिओचा आधार घेऊनच सासरचे लोक पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होते.



