क्राईम
इतक्या गोळ्या मारेन की घरचे ओळखणार नाहीत

- एका तरुणीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर रिव्हॉल्व्हर ठेवून थेट धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
- उत्तर प्रदेशमधील या व्हिडीओमध्ये एक तरुणीने आपल्या गाडीतून पिस्तुल घेऊन थेट पेट्रोल पंपाला धमकावताना दिसत आहे. पेट्रोल टाकण्यासाठी आलेला कारमालक आणि पेट्रोल पंपावारील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादानंतर कार मालकाच्या लेकीने हा प्रताप केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
- एहसान खान नावाची व्यक्त हरदोई येथील बिलग्राम या भागातील पेट्रोल पंपावर सीएनजी टाकायला गेले होते. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने एहसान यांना सुरक्षेच्या कारणामुळे कारमधून उतरण्यास सांगितले होते. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि एहसान यांच्यात वाद चालू झाला. हा वाद वाढत असताना खान यांची पत्नी तसेच त्यांची मुलगी या वादात सहभागी झाल्या.
- हा वाद चालू असताना एहसान यांची अरिबा नावाची मुलगी पळत-पळत कारजवळ गेली आणि तिने कारमधून गोळ्यांनी भरलेले पिस्तुल बाहेर काढले. अरिबाच्या हातात परवाना असलेले पिस्तुल होते. हे पिस्तुल तिने थेट पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर ठेवून त्याला धमकावले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मध्ये येत वाद मिटवला.
- अरिबा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला धमकावत असतानाच प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. धमकावण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव रजनीश कुमार असे आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाची सध्या चौकशी चालू आहे.



