मनोरंजन
लाडकी बहीण योजनेवर चित्रपट येणार

- महाराष्ट्र शासनाच्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’वर आधारित एक विशेष मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आणि त्यांचे कुटुंबातील स्थान बळकट करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली ही योजना आता रुपेरी पडद्यावरही पाहायला मिळणार आहे.
- या सिनेमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तिच्यासोबत ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेले अण्णा नाईक हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. प्रेक्षकांसमोर ही नवीन जोडी वेगळ्या रुपात दिसणार असून, त्यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरेल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे.
- या चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म्स आणि शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त प्रयत्नातून केली जात आहे. निर्माते म्हणून शीतल शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे काम पाहत आहेत, तर दिग्दर्शनाची धुरा गणेश शिंदे यांच्याकडे आहे. पटकथा आणि संवाद लेखन शीतल शिंदे यांनी साकारले आहे.
- सातारा येथे नुकताच या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला असून त्याच्या मुहूर्ताचा क्लॅप सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते देण्यात आला. हा चित्रपट केवळ योजनेवर आधारित माहितीपर सादरीकरण न करता त्यामध्ये समाजातील सामान्य महिलांच्या संघर्षाची झलक आणि त्यांच्या स्वप्नांची उमेद दाखवणार आहे.



