क्राईम
ऑनलाईन रम्मीचा नाद जडला, कर्जबाजारी झाला

- पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाची हत्या करून 30 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धाराशिव तालुक्यातील बावी येथे ही घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ऑनलाईन रम्मी गेममध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे गमावल्याने लक्ष्मण हा कर्जबाजारी झाला होता.
- पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण आणि तेजस्विनी यांचा तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांना शिवांश नावाचा दोन वर्षांचा मुलगा होता. जाधव यांचा सुखी संसार सुरु होता. मात्र लक्ष्मण हा ऑनलाईन गेम रम्मी खेळत असे. याशिवाय शेअर बाजारातही त्याने पैसे गुंतवले होते.
- मात्र या दोन्ही ठिकाणी त्याचे खूप आर्थिक नुकसान झाले होते. यातून तो कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने त्याने जमीन काही दिवसांपूर्वी विकली होती. तर काही दिवसांपूर्वीच त्याने राहते घर देखील विकले होते. मात्र तरीही कर्ज फिटले नाही. आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने लक्ष्मणने पत्नी आणि मुलाला विष देऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केला आहे.
- या घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोस्टमार्टेम अहवालानंतर अंतिम कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



