सोलापूर शहरात घोंगडे वस्ती, विजापूर वेस, विजापूर नाका, फॉरेस्ट, रेल्वे स्टेशन, नीलम नगर, जुना विडी घरकुल, विमानतळ, बाळीवेस, अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला, फळे विक्रेते, चारचाकी फेरीवाले हे आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात.
त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल ४० वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चारचाकीवाले, फेरीवाले हे आपली रोजीरोटी व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत. यासाठी ७० फुट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला, फळे विक्री करत आहेत. यावर त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे. परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर दोन-तीन महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते. कारवाई दरम्यान त्यांनी उधार, उसने किंवा कृषी उत्पन्न समिती बाजारामधून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे व जीवनाश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उध्वस्त केले जाते. कारवाईच्या नावाने जप्त केले जाते. त्यामुळे त यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते.
प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन कांही ऐकत नाही. यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची सक्रांत आहे. साहेब हातावरचे पोट असून आम्हाला जगू द्या, आमच्या पोटावर पाय देऊ नका. अन्यथा हि पोटातली आग डोक्यात जाईल. जर हा निर्णय नाही लागला तर ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठनेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी जाहीर सभेत दिला.
आज लाल बावटा फेरीवाला चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सिटू सलंग्न च्यावतीने ७० फुट भाजी मंडई वरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणा विरोधात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), माकपाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) व संघटनेच्या अध्यक्षा माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली ७० फुट भाजी मंडई पासून ते संत तुकाराम चौक, पाथरूट चौक, पोटफाडी चौक, सिव्हील चौक, रंगभवन मार्गे, जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. तद्पुर्वी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्यांसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चे अंती आयुक्तांनी अल्पावधीतच संबंधित विभागांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी आश्वासित केले. यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, खाजाभाई करजगी, ॲड अनिल वासम, रुक्मिणी कवळे,शांताबाई कोळी, चाँद शेख, जाफर शेख, सादिक बागवान, उर्मिला वाघमारे आदींची उपस्थिती होती.