क्राईम
दोन नामांकित महिला डॉक्टरांचे अश्लील एआय व्हिडिओ व्हायरल

- राज्यातून एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. दोन नामांकित महिला डॉक्टरांचे एआयच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ बनवले गेले. हा व्हिडीओ बनावट असून परराज्यातून तयार करण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- कराड शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यामागचा सूत्रधार स्वतःला ‘डॉक्टर’ असल्याचे सांगतो, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
- पंधरा दिवसांपूर्वी दोन महिला डॉक्टरांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सोशल मीडियावर त्यांचे अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. तपासाअंती हे व्हिडीओ एआय तंत्रज्ञानाने बनवले गेले असून त्यात संबंधित डॉक्टर महिलांना दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह कृती करताना दाखवले गेले.
- तपासा दरम्यान पंजाबमधील विकास शर्मा या इसमाचा तपासात सहभाग निष्पन्न झाला असून त्याने कबूल केले की, कराडमधीलच एक डॉ. राजेश शिंदे यानेच हे व्हिडीओ तयार करण्याची योजना आखली होती. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त करून तपास सुरू केला आहे.
- विकासने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे त्याने हे काम केले. आरोपी शिंदे याने त्याला काही मोबाईल क्रमांक पाठवले व त्या नंबरचे गट तयार करून अश्लील व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. यानंतर एआयच्या सहाय्याने खोटे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.
- या बनावट व्हिडीओंमुळे संबंधित महिला डॉक्टरांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसू शकला असता, मात्र त्यांनी वेळेवर पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे व्हिडीओ व्हायरल होण्याआधीच नियंत्रण मिळवता आले.



