क्राईम

पुणे पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस हवालदाराचा लेटरबॉम्ब

पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे काल सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत. केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकाराने पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार केमदारणे हे काल सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत. गायब होण्याआधी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली असून मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे यामध्ये लिहिले आहे. 

केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे आणि माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक कोकणे हेच जबाबदार आहेत, असेही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आले आहे. या खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सवाल उपस्थित केला आहे.

खात्याव्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल, असा इशाराही दिला आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली असून केमदारणे नेमके बेपत्ता का झाले? त्यांच्या बेपत्ता होण्यामागे इतर काही कारण आहेत का? खरंच कोकणे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती का? आणि कशासाठी दिली असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Related Articles

Back to top button