सोलापूर ब्रेकिंग! एआय जादू आहे पण परिणाम गंभीर असणार

सोलापूर, (प्रतिनिधी):- वेगाने बदलत असलेल्या युगात कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थातच ए आय चा वापर सर्वच क्षेत्रात होत आहे. ए आय हे जादू असले तरी त्याचे परिणाम भविष्यात गंभीर असणार आहेत असे प्रतिपादन जगप्रसिध्द लेखक आणि माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित ए आय ची जादू आणि उद्याचे जग या विषयावर शनिवार दि. 7 जून रोजी लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, अध्यक्षा रेणुका महागांवकर, प्रशांत बडवे, प्रा.दिपक देशपांडे, अमोल धाबळे, पृथा हलसगीकर, अविनाश महागांवकर आदी उपस्थित होते.
एआयची भिती आणि कुतुहूल मोठ्याप्रमाणात आहे. सन 2010 पासून सुरू झालेल्या एआयचा प्रवास आजच्या काळात प्रचंड वेगाने आणि सर्वच क्षेत्रात होत आहे. मानवाला जे आवश्यक आहे ते सर्व एआय, रोबोट यांच्या माध्यमातून होत आहे. माणूस संगणकाच्या माध्यमातून जी माहिती फिड करेल त्यापेक्षाही अधिक काम एआयच्या माध्यमातून सुरू झाले आहे. हॉटेल, हॉस्पिटल, कृषी, मनोरंजन पासून सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढलेला आहे. त्याचे कुतुहल अधिक असतानाच त्याचे परिणामही गंभीर राहणार आहेत. अवघ्या काही वर्षातच त्याचे परिणाम दिसू लागतील. अनेकांच्या नोकर्या यामुळे जाणार आहेत. त्यातच विषमता वाढणार आहे. कार्पोरेट कंट्रोल सुरू होणार, असेही गोडबोले यांनी सांगितले. भविष्यात एआय चा वापर तळागाळातील लोकांसाठी झाला पाहिजे विषमता दूर झाली पाहिजे आणि मानवी जीवनाचे कल्याण होण्यासाठी एआयचा वापर झाला तरच खर्या अर्थाने प्रगती होणार आहे, असेही अच्युत गोडबोले यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक करीत कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली.
त्यानंतर अमोल धाबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बारावीच्या सीबीएसई बोर्डात सुयश ज्युनिअर कॉलेजमध्ये तिसर्या क्रमांक घेवून उत्तीर्ण झालेल्या आर्यन विनायक होटकर आणि दहावीमध्ये सिध्दनाथ जोशी याने यश संपादन केल्याबद्दल दोघांचा सत्कार अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश कुलकर्णी यांनी केले तर आभार पृथा हलसगीकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मसापचे प्रसिद्धीप्रमुख विनायक होटकर; अभय जोशी, प्रकाश मोकाशे आदींनी परिश्रम घेतले.



