सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! आशाराणी भोसलेची आत्महत्या की पूर्वनियोजित हत्या?

सोलापूरमध्ये आशाराणी भोसलेचा हुंडासाठी छळ करण्यात आला. त्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या प्रकरणाची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे तपास करून न्याय दिला जावा, असे थेट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या आशाराणीने तीन जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज माध्यमांतून समोर आला आहे. 

मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींच्या मानसिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. त्यांनी तातडीने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. शिवाय सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. आशाराणी या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे. ही बाब मन हेलावणारी आहे. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींकडून त्यांना सातत्याने छळ सहन करावा लागत होता.

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लगेचच सोलापुरात घडलेली ही घटना महिलांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाला सखोल आणि निष्पक्ष तपासाचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, ही आत्महत्या की पूर्वनियोजित हत्या याचा तपास वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पद्धतीने करण्यात यावा. घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल आणि गळफास लावण्याच्या स्थितीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा. या प्रकरणात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून डॉ. गोऱ्हे यांनी तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे आणि जलदगतीने तपास करून न्याय दिला जावा, अशी भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी घेतली आहे.

Related Articles

Back to top button