सोलापूर
सोलापूर! नवरा बाहेर जाताना आशाराणीला घरात कोंडून ठेवायचा, मोबाईल देत नव्हता

- पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाचे पडसाद थांबण्याआधीच सोलापुरात आणखी एका विवाहित महिलेच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे २२ वर्षीय आशाराणी भोसले हिने जीवन संपवल्याचे बोलले जात असले तरी, तिच्या बहिणीने यामागे थेट हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आशाराणीच्या सासरच्या लोकांनी केवळ हुंड्यासाठीच नव्हे, तर मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, असा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे.
- दरम्यान आशाराणीची बहीण उषाराणी भोसले हिने सांगितले, माझी बहीण आत्महत्या करू शकत नाही. गळफास घेतलेले ठिकाण उंच आहे, तिचा हात तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ही आत्महत्या नाही, तर हत्या आहे. तिने नवऱ्याच्या वागणुकीवरही गंभीर आरोप करत सांगितले की, पवन भोसले तिला मोबाईल देत नसे, घरात एकटीला बंद करत असे आणि चारचाकी गाडी व पैशासाठी सातत्याने छळ करत असे.
- आशाराणी आणि उषाराणी या दोघींचाही विवाह एकाच घरातील भावंडांशी झाला होता. मात्र कुटुंबीयांनी दावा केला आहे की, आशाराणीचा विवाह किडनॅप करून जबरदस्तीने लावण्यात आला होता. तिला आधी औषध पाजून मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. पण ते प्रकरण दबावाखाली मिटवले गेले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मृत आशाराणीला तीन वर्षांची मुलगी असून ती सध्या तीन महिन्यांची गर्भवती होती.
- अशा अवस्थेतही सासरच्या लोकांनी तिला पैशासाठी त्रास दिला, मारहाण केली आणि अखेर छळ सहन न झाल्याने तिचा मृत्यू झाला, असे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही समुपदेशन करून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आले होते. या प्रकरणी आशाराणीचा नवरा पवन, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले या तिघांना अटक करण्यात आली आहे.



