क्राईम
पुण्यात आणखी हुंडाबळी

- पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्याप्रमाणेच आणखी एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे ही विवाहिता अवघ्या 22 वर्षांची असून लग्नाच्या पाचव्या महिन्यातच तिने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेला सुमारे एक महिना उलटला असून या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
- पूजा निर्वळ असे आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय विवाहितेचे नाव आहे. पूजाच्या मृत्यूप्रकरणी पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्याविरुद्ध छळ केल्या प्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीस फक्त गुन्हा दाखल करून शांत बसले आहेत. या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत. लग्न झाल्यानंतर अवघ्या पाचव्या महिन्यातच पूजाने आत्महत्या केली होती. बाईक घेण्यासाठी पूजाच्या माहेरच्यांनी 50 हजार रुपये दिले नव्हते. याच कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिचा छळ केला जात होता. परिणामी या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
- दरम्यान, आमच्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस आम्हाला सहकार्य करत नाहीत, असा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर याबाबत विचारले असता या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.



