- विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय घटना होताना दिसत आहेत. त्यातच महाविकास आघाडीला राजकीय धक्के बसत आहेत. आता सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला तगडा झटका बसला आहे.
- काँग्रेसचे जेष्ठ नेते, अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. म्हेत्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ३१ मे रोजी म्हेत्रे हे कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आगामी काळात अक्कलकोट तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
- आता त्यांचे कट्टर विरोधक आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
- माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे महायुतीत आपण स्वागत करतो. काँग्रेस सत्तेपासून बरीच लांब गेली आहे. त्यामुळे म्हेत्रे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेना ही हिंदुत्ववादी आहे. म्हेत्रे यांनी हिंदुत्व विचाराचा विरोध केला होता. आता त्यांनी हिंदुत्व विचारसरणी स्वीकारली असेल तर त्याचे आपण स्वागत करतो, असेही ते म्हणाले.
- म्हेत्रे यांनी फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे अस्तित्व राहिले नाही. त्यांनी हा निर्णय घेताना लोकांना सांगायला पाहिजे होते, असेही ते म्हणाले.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे शिंदे गटात प्रवेश करणार!
