- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक (वय वर्ष 23) हिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला वैष्णवी नेमकी कोण आहे? याबाबतची कोणतीही माहिती समोर आली नव्हती. परंतु, घटनेच्या काही वेळातच सदर महिला ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून असल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबत आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच आता तिने आत्महत्या केल्याबाबतची अनेक कारणे समोर येऊ लागली आहेत. वैष्णवी हिचा तिच्या सासरच्या मंडळींकडून वांरवार छळ होत होता, ज्यामुळे तिने लग्नाच्या दोन वर्षातच आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
- समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरच्यांनी आपला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्याला नवरा शशांक हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हिने ऑगस्ट 2023 पती शशांक याला ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली होती. पण तेव्हा शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल, असे म्हणून शशांक व त्याच्या घरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती. शशांक याने वैष्णवीला जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करून माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हाकलून देईन, असे म्हणत घरातून बाहेर काढले.
- पती शशांक याने घराबाहेर काढल्यानंतर वैष्णवी माहेरी आली होती. त्यानंतर तिने तिच्यासोबत होत असलेली छळवणूक व हुंड्यासाठी पैशाची मागणी याबाबतची माहिती तिच्या आई-वडीलांना दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली होती. इतकेच नाही तर सनीज वर्ल्ड या पुण्यातील सर्वात महागड्या ठिकाणी लग्न करून देण्याच्या अटीवरच हा लग्नसोहळा पार पाडला होता, अशी माहिती या एफआयआरच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी वैष्णवीची सासू, नणंद आणि पती शशांक यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
51 तोळे सोने, फॉर्च्युनर देऊनही व्हायचा वैष्णवीचा छळ
