झालेला अपघात बघण्यासाठी थांबले, अनर्थ घडला

कोणाची कधी वाईट वेळ येईल हे सांगता येत नाही, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई – गोवा महामार्गावर असाच एक प्रकार भयानक घडला आहे. समोरच्या गाडीला अपघात झाला म्हणून अपघात बघण्यासाठी थांबलेल्या तरुण – तरुणीला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनुष्का माळवे (राहणार अणाव) आणि विनायक निळेकर (राहणार रानबांबुळी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनुष्का आणि विनायक हे दोघेही मुंबई – गोवा महामार्गावरून बाईकने प्रवास करत होते. त्याचवेळी त्यांच्यासमोर कारला अपघात झाला. कारला अपघात झाल्यामुळे दोघेही बघण्यासाठी थांबले. बाईक बाजूला लावून अनुष्का आणि विनायक हे कार अपघात पाहत होते. त्याचवेळी भयंकर घडले. मागून येणाऱ्या डंपरने दोघांनाही जोरदार धडक दिली. या धडकेत अनुष्का आणि विनायक यांचा जागीच मृत्यू झाला. ओरोसकडून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा कारने लाईटच्या खांबाला धडक दिली या कारमधून प्रवास करणारे दहा जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अनुष्का आणि विनायक हे दोघेही याच वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते.



