क्राईम
ब्रेकिंग! पुण्यातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

- पुण्यातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेसेज पाठवल्याप्रकरणी आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ससून रुग्णालयातील एका डॉक्टरच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने बॉम्ब असल्याचा मेसेज पाठवला होता.
- या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून रुग्णालयातील सुरक्षा रक्षकच आरोपी निघाल्याचे समोर आले आहे. ससून रुग्णालयात बॉम्बची अफवा पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अरविंद कृष्णा कोकणी (29) याला येरवडा परिसरातून अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली असता तो ससून रुग्णालयातच सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असल्याचे समोर आले आहे.
- आरोपीने मोबाईल हा ससून रुग्णालयातील एका महिला रुग्णाचा चोरला होता. या महिला रुग्णाच्या मोबाईलवरुन त्याने ससून रुग्णालयाच्या एका डॉक्टरच्या मोबाईलवर ससूनमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज केला होता. त्यानंतर आरोपीने मोबाईल स्विच ऑफ केला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा मोबाईल सुरु करुन ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचा मेसेज करुन पुन्हा बंद केला.
- दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तपास करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत.



