सोलापूर येथील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात पोलिसांना सुसाईड नोट आणि एक महत्त्वपूर्ण कॉल रेकॉर्डिंग सापडले असले तरी आरोपी मनीषा मुसळे माने हिच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी आणखी पुराव्यांची गरज भासणार आहे. केवळ सुसाईड नोट पुरेसा पुरावा ठरू शकत नाही, असे कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे.
डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या केल्यानंतर उपचारादरम्यान काढलेल्या त्यांच्या कपड्यांमधून (पॅन्टच्या खिशात) पोलिसांना दुसऱ्या दिवशी सुसाईड नोट सापडली. ही नोट पोलिसांच्या दृष्टीने मनीषा हिच्या विरोधात महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. मात्र, कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, केवळ या नोटच्या आधारावर मनीषाला दोषी ठरवणे कठीण आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी नोटमधील मजकुराला दुजोरा देणारे इतर परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांना गोळा करावे लागतील. असे पुरावे न मिळाल्यास उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनुसार आरोपी निर्दोष सुटू शकतो, असे तज्ज्ञ वकिलांनी सांगितले.