क्राईम

ब्रेकिंग! पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडचे नाव समोर

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळ्या देशाला हलवून सोडले. या हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टेंस फ्रंटने’ घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तान स्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा चेहरा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांमागे दहशतवादी सैफुल्लाह खालिदचे डोकं आहे. तो या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.

लश्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह खालिद सैफुल्लाह कसुरीच्या नावाने सुद्धा ओळखला जातो. भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफीज सईदचा तो निकटवर्तीय आहे. हाफीज सईदने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. खालिदला आलिशान गाड्यांचा शौक आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेले दहशतवादी त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. पाकिस्तानी सैन्यातही त्याचे वजन आहे. हा पाकिस्तानी सैनिकांना नेहमी भडकवण्याचे काम करत असतो.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी खालिद हा पाकिस्तानच्या पंजाबमधील कंगनपुर येथे आला होता. तिथे पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन राहते. तिथे पाकिस्तानी सैन्याचा एक कर्नल जाहिद जरीन खटकने त्याला जिहादी भाषण देण्यासाठी बोलावले होते. तिथे आल्यानंतर पाकिस्तानी कर्नलने खालिदवर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर त्याने पाकिस्तानी सैन्याला भारताविरोधात भरपूर भडकावले. भारतीय सैनिकांची जितकी हत्या कराल, तितका अल्लाह तुम्हाला फळ देईल इथपर्यंत खालिद बोलून गेला.

Related Articles

Back to top button