क्राईम
मोठी बातमी! पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला, २७ जणांचा मृत्यू

- जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ माजली असून सुरक्षा दलाकडून दहशवाद्यांचा शोध घेतला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला आहे. त्यानंतर आता शहा हे श्रीनगरला रवाना झाले आहेत.
- पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील एका पर्यटन स्पॉटवर आज दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. यात अनेक पर्यटक जखमी झाले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- हे पर्यटक राजस्थानहून आल्याचे समोर आले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील वरच्या भागात हा गोळीबार झाला असून, या घटनेनंतर सुरक्षा दलांकडून परिसरात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जात आहे.
- अलिकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हिंदूंविरुद्ध एक भडकाऊ विधान केले होते. यानंतर लगेचच दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे. त्यात अवघ्या काही दिवसात अमरनाथ यात्रादेखील सुरू होणार असून, पहलगाम हे पर्यटन क्षेत्र असल्याने आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र, आजच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.